बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने पीडितेवर पुन्हा एकदा बलात्काराचा प्रयत्न

महिलेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या अटकपूर्व जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेनं याला विरोध केला म्हणून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुण्याच्या भीमा कोरेगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे.

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीने पुन्हा पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने या नराधमाला विरोध केला म्हणून आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. राहुल वाळके असं आरोपीचं नाव असून घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित महिला उदरनिर्वाहासाठी गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातील पेरणे येथे वास्तव्यास होती. पीडित महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी आरोपी राहुळ वाळकेकडून उधार पैसे घेतले होते. याचाच गैरफायदा राहुल पीडित महिलेशी मैत्री करुन आणि जादूटोण्याचं ढोंग करुन घेत होता. या दरम्यान आरोपी राहुलने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तकारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, अटकपूर्व जामीनावर आरोपी मोकाट फिरत होता.

बाहेर असताना आरोपी राहुलने पीडित महिलेला धमक्या देणे सुरुच ठेवलं होतं. आरोपीच्या धमक्यांच्या भीतीपोटी पीडित महिला पेरणेहून भीमा कोरेगाव येथे राहायला आली होती. मात्र, तिथेही आरोपीने तिला त्रास देणे सुरुच ठेवलं. काल तर आरोपी राहुलने तिच्या घरी जाऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याचा विरोध केला म्हणून तिला जीवे मारण्याचाही राहुलने प्रयत्न केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरुन रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. आरोपीला तातडीने अटक करुन कडक कारवाई करु, असं शिक्रापूर पोलिसांनी सांगितलं आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या धक्कादायक प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बलाकारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटकपूर्व जामीन मिळतोच कसा? असा प्रश्न उपस्थित करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसच्या जिल्हा अध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केली आहे.